लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! (मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना – जानेवारी 2025)
लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. अनेक महिलांना आशा होती की मकरसंक्रांतीपूर्वी हा हप्ता जमा होईल, मात्र अजूनही सातवा हप्ता त्यांच्या खात्यावर आलेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता 26 जानेवारीच्या अगोदर सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल. त्यांनी स्पष्ट केले की, या हप्त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला मिळाली आहे आणि हा निधी लवकरच वितरित केला जाणार आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “लाडकी बहिण योजना महिलांसाठी महत्त्वाची असून, योजनेचे उद्दिष्ट महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आहे. 26 जानेवारीपूर्वी सातवा हप्ता जमा केला जाईल, याची खात्री देण्यात येत आहे.”
लाभार्थींनी आता 26 जानेवारीपूर्वी त्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्याची अपेक्षा ठेवावी, असे आवाहन मंत्री महोदयांनी केले आहे. ही घोषणा महिलांसाठी मोठा दिलासा देणारी आहे आणि त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.